एका रुपयाच्या खर्चात सिल्लोडच्या डॉक्टरांनी साकारला सुपारेश्वर इको फ्रेंडली गणेशा
अनिल साबळे | छत्रपती संभाजीगनर: सध्या सर्वत्र विविध प्रदूषणामुळे पर्यावरणाचा रहास होत असून पर्यावरण संवर्धनासाठी अनेक जण काम करीत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सिल्लोड येथील डॉ संतोष पाटील यांनी अवघ्या एका रुपयाचा खर्च करून सुपारी पासून सुपारेश्र्वर इको फ्रेंडली गणेशा साकारला आहे. या गणेशाच्या सजावटीसाठी नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आला आहे.
पूजेच्या सुपारीला गणपती मानले जाते. याच सुपारीची नारळात स्थापना करून साकारला आहे "सुपारेश्वर". सुपारी व नारळ हे कोकणचे वैभव आहे. सजावटीमध्ये पिंपळाच्या 8 पानांचा अष्टविनायक म्हणून वापर करून गणेशाची अप्रतिम हरित प्रतिमा साकारली आहे. लाकडी फळं व पेपरचा उपयोग करून फुलमाळा, वनस्पतीच्या पानांपासून बनवलेल्या रंग व तांदूळ चूर्ण यापासून नैसर्गिक हिरवा रंग, हळद, बिट पावडर पासून लाल रंगांची रांगोळी साकारली आहे. श्री गणेशास प्रिय असलेले तेरडा तथा गौरी पुष्प, आणि पुरातन काळी लिखाण काम व शिक्षनासाठी लागणारी निळी शाई ज्या वनस्पती पासून बनते ती दुर्मीळ निळ (शारदा) ही वनस्पती गणपती शेजारी ठेवून गणपती ही विद्येची देवता आहे हे अधोरेखित केले आहे.
पूजेत दुर्मिळ झालेले "देशी झिनी" तांदूळ वापरले असून दुर्मिळ तांदळाचे संवर्धनाचा संदेश दिला आहे. प्लास्टिकचा कुठे ही वापर करण्यात आला नाही. पारंपरिक वाद्य सनई वाजवणारी लाकडापासून निर्मित गायिका स्वागतास उभी आहे. धूप म्हणून अजिंठा डोंगरतील सलई गुग्गुळ वापरण्यात आली आहे. या सुपारेश्वराचे घरीच कुंडीत विसर्जन करण्यात येणार असून त्याचे मातीतच आपोआप 40 दिवसात विघटन होईल असे डॉ. संतोष पाटील यांनी सांगितले.